Thursday 11 August 2011

माझ्या मनाची अवस्था

मित्रांनो नमस्कार,
आज मला सकाळ पासूनच खूप अस्वस्थ वाटत आहे काहीही करु नये असच वाटत.सकाळ पासूनच चिडचिड होतेय. उगाचच आई वर राग यायचा. चिडलो तिच्यावर पण कुठेतरी मनामध्ये त्याबद्दल वाईटही वाटतंय. सुचत नाही, कामात लक्ष्य लागत नाही, आज पर्यंत अस कधीच झाल नाही आजच का? हे मात्र निरुत्तरच आहे. माझ्या या त्रासाबद्दल मला कृपया आपण मला सर्वांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
धन्यवाद...........

Wednesday 20 July 2011

प्रेम

प्रेम उमजून समजून जाणून करता आल असत
तर किती बर झाल असत
..........निदान प्रेमासाठी प्राण देणाऱ्या प्रेमिकांच
अर्थहीन मरण टळल असत
..........फक्त नजरेला नजर मिळाली म्हणून
प्रेम व्यक्त केल गेल नसत
...........हृदय विनाकारण चुकीच्या हातात
खेळण्यासारख दिल गेल नसत
....प्रेमाच्या नावाखाली बरचस चुकीच
बाजारात विकल गेल नसत
...........प्रेमाला जिवापेक्षा जास्त महत्व
कधीच प्राप्त झाल नसत
............प्रेमात आणि युद्धात सार क्षम्य असत
अस म्हंटल गेल नसत
..........दोन्हीत मरणाच्या शक्यतेला गृहीत
कधीच धरल गेल नसत
...........एखाद प्रेम न जाणणार प्रेमळ हृदय
प्रेमाचाच बळी ठरलं नसत
..........प्रेमासाठीच प्रेम जगात या बदनाम
चुकुनही कधी ठरलं नसत
.............

Monday 18 July 2011

मी सुखरूप आहे

मी सुखरूप आहे
आज सकाळी निघताना तू म्हणालीस,
"
पोहोचल्यावर फोन कर रे , आणि सांग...
'
मी सुखरूप आहे....' "
तेव्हा तुझी चेष्टा केली आणि म्हणालो,
..."
मी काय लहान आहे का आई...."ऑफिसमध्ये पोहोचलो, चहाचे पैसे देताना
खिशात हात घातला तेव्हा आठवलं,मोबाईल घरीच राहीला
आणि तुला सांगायचंच राहिलं,
'
मी सुखरूप आहे....'
लंच टाईमच्या आधी टेबलवर प्रमोशनचं लेटर आलं
तुला ऑफिसमधून ही आनंदाची बातमी द्यायला फोन लावला
एवढ्यात मित्रांनी गराडा घातला
पार्टीचा धोसरा लावला
आणि तुला सांगायचंच राहिलं,
'
मी सुखरूप आहे....'
संध्याकाळी परत येताना मिठाईचा पुडा घेतला
आणि माझ्याच विचारात चाललो होतो
तुला ही बातमी लवकर सांगायची होती
एवढ्यात बधीर करणारा एक आवाज कानावर आदळला
डोळ्यांपुढे अंधारी आली आणि कानावर पडल्या असंख्य किंकाळ्या
जीवाच्या आकांताने आक्रोश करणा-या अगतिक लोकांच्या
पण तुला सांगायचं होतं,
'
मी सुखरूप आहे....'
जाणवत होत्या फ़क़्त वेदना
प्रत्येक सेकंदाला वाढत जाणा-या
आणि आठवत होते तुझे पाणीदार डोळे
मी जाताना माझ्याकडे बघत राहणारे
शेवटचा श्वास तुटत होता पण तुला सांगायचं होतं,
'
आई......मी सुखरूप आहे....'

Friday 24 June 2011

विचार करा


विचार करा

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी

आणि लग्न होणार असलेल्यांनी ......

नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत होती, सगळे शब्द
जुळवून मी तीलासांगितलं, मला घटस्पोट हवाय."

तिने शांतपणे विचारल,- "का?"

तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं. लग्न
मोडायला नेमकं काय आहे, हे तिल जानुनघ्यायच होत; पान माज़् मन दुसर्य स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.

माझा बँक बलन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं: पण मी समोर केलेल्या
घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इच्छाहोती. तिची
कारणे साधी होती. महिन्याभरातआमच्या मुलाची परिक्षाहोती आणि
त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे
रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. मला वाटलं तिला वेड
लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला
नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही
फार अवघडून गेलो. मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.

दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नीटबघितलेच नाही हे मला जाणवलं; आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू
लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबत बेडरूम पर्यंत नेताना
आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं. रोजच्या प्रमाणे
तिला अचानक उचलताना मला जाणवलं तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तीच कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.

आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती. जी
परत आयुष्यात येत होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या
प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच
स्पष्टपणे सांगितले. ती चिडली, संतापली, पण आता मला काही ऐकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा
गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर माझी प्रिय पत्नी बेडवर
निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या
प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू
तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार , बंगला , प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचार--- " आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे-- जे प्रेमाच आहे, जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्चाताप....



धन्यवाद्,

Thursday 9 June 2011

प्लान.! एक संदेह कथा


"थेरडे! थेरडे सोड तिला. अगं दम काढशील तिचा. मरेल ती. सोड! सोड म्हणतेय ना मी.", हवालदारीण मंजुळाला पकडून खेचत होती. पण आज मंजुळा दोन पोलिसांना ऎकत नव्हती, एवढी तिच्या हाती ताकद आली होती. सवित्रीला जाऊ द्यायचेच नाही असे तिने ठरवलेले. आज शनिवारची नामी संधी मिळाली होती तिला. कपड्यावरचे डाग नीट धुतले गेले नाहीत म्हणून सकाळी सावित्री आली अन तिने आचारी मंजुळाशी वाद घातला. दोन दिवसापूर्वी मंजुळाने साऱ्याजणींचे कपडे धुतले होते. सावित्रिचे सगळे मात्र मळलेले होते. मग काय दोन रान मांजरी भिडल्या. आपल्या बापाचं ज्यांनी कधी ऎकलं नाही त्या एकमेकींचं काय ऎकून घेतील? झालं मग द्वंद्व. सावित्रीचा गळा आवळण्यात मंजुळाला जो आसूरी आनंद मिळत होता त्याचा मध्येच येऊन हवालदारिणींनी बेरंग केल नसता तर ... आज आणखी तीस वर्षांची खुनाची नवी शिक्षा पक्की झाली असती. एकतर मंजुळाची नाहीतर सावित्रीची...

बऱ्याच प्रयत्नानंतर मंजुळाच्या हातांचा फास सुटला अन दोघी वेगळ्या झाल्या. "मोघेबाई सोडा मला. ह्या हायवानेला कापून तिचं मटण शिजवून न्हाय खाल्लं तर नावाची मंजुळा नाय.", दोन लेडी कॉन्स्टेबलनी पकडून ठेवलेल्या मंजुळाच्या अंगात दैत्य संचारलं होतं. सावित्री जीभ ओकून तिचा गळा साफ करीत कशीबशी श्वास घेत होती. त्याच जोरात मंजुळाने तिला एक दोन लाथा झाडून घेतल्याच. एका थोराड दिसणाऱ्या पोलिसी बाईने मंजुळाच्या पाठीत दांडा हाणला.

"बराच माज चढलाय आज तुला? हं! जिरवते तुझी. बघच तू. आमच्या राज्यात मारामारी करते. बापाचा खून करणारी तू अजून तहान संपली न्हाय वाटते...", जेलर मोघे चिडली. तिने आणखी दोन दांडुके मंजुळाच्या पाठीत हाणले. तिकडे कॉन्स्टेबल फर्नांडीस सावित्रीला मुस्काटात मारीत होती. सावित्री आधीच अर्धमेली झालेली होती.
"घेऊन जा तिला.", मोघे चिडून फर्नांडिसला म्हणाली, "मरायला आली असेल तर डॉक्टरांना फोन लाव. तोवर मी हिला बघते.", असं म्हणून मोघेने जळजळीत नजरेनं मंजुळाकडे पाहिलं. मंजुळाची आज धडगत नव्हती.

न्हाणीघर, धोबणहौद अन विझिटर रूम मागे पडल्या तसं मंजुळाला कळू लागलं की तिला एकशेतेरा नंबरच्या काळकोठडीत न्हेताहेत. आजूबाजूला काम करणाऱ्या मंजुळाच्या जेलच्या इतर भगिनी भेदरलेल्या डोळ्यांनी मंजुळाला दंडाला पकडून फरफटत नेणाऱ्या मोघेबाईंकदे बघत होत्या.
"जोर चढलाय! काय? निघेल तुझा जोर जेव्हा अंधारकोठडीत रहायला लागेल आठवडा. विना पाणी विना अन्न. स्वयंपाकीण न तू. अन्नाला तरसशील. बघते कशी जोर लावतेस अस्सा मग. पन्नास वर्षाची थेरडी झालीय पण जोर बघा? विशीतल्या पोरीसारखा. चल दावतेच तुला..." मोघेबाईं आपली टेप मंजुळाला ऎकवत संपूर्ण रस्ता लगबगीत चालत होत्या. मंजुळा डिवचलेल्या नागिणीसारखी दंडाला हिसडे देत होती. पाच मिनिटांच्या बेसमेण्टच्या पायऱ्या उतरल्यावर पहिली अंधारकोठडी लागली. आतून कण्हण्याचे आवाज येत होते. १०१, १०२, १०३ अशा बारा अंधारकोठड्या गेल्या पण सगळ्यांची एकच गत. अन्न पाण्याविना डांबलेल्या बायका आत निपचित पडून मरणासन्न आवाजात हंबरत होत्या. चंदरपूरची ही जेल म्हणजे राज्यातली बायकांची सर्वात बदनाम जेल होती. चंदरपूरला पाठवणार हे ऎकून तर कित्येक बायका कोर्टातच घेरी येऊन पडत. जिने कुणी ह्या जेलात आपला काळ घालवलाय तिला नरकयातना म्हणजे काय ह्याचा पूर्ण प्रत्यय आलेला असे. त्यानंतर भीक नको पण कुत्र आवरअशा आशयात कित्येक जणी आयुष्यभर पुन्हा खून-दरोड्यांच्या गावीही जात नसत.

मंजुळा मात्र इथे जन्मभर अडकली होती. वयाच्या पंचविसाव्या वर्षी लग्न होत नाही म्हणून तिच्या बापानेच तिला भोगली. आईची माया वयाच्या पाचव्या वर्षीच हरवलेली. भाऊ बापाच्या वळणावर लागून आधीच जेलात बसलेले. मग आपलं दुःख सांगावं कुणा? आपल्यातच घुसमटलेली तिची कडकलक्ष्मी झाली नसती तर नवलंच. एका रात्री बापाने पुन्हा तिच्या चारित्र्यावर हल्ला केला तसं तिनं कोयत्याने बापाचा गळा चिरून काढला. तोच तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण. त्यानंतर शेजाऱ्यांच्या घरी दरोडा अन एका वाण्याच्या घरी चोरी न त्याचा खून. असे दोन खून आणि दोन दरोडे तिच्या नावावर जमा होते.

त्याजोरावर इथून निघणे आयुष्यभर शक्य नव्हते. पण अशा रौरवात राहूनही पुढचे सात दिवस काळकोठडीत घालवणे म्हणजे ह्या आगीतून त्या फुफाट्यात! अंधरात अडखळत चालणाऱ्या मंजुळाला एकशेतेरा नंबर आल्याचे कळले. कारण मोघे थांबली होती. सूर्याची भनकही लागू द्यायची नाही अशा पद्धतीने बनवलेला काळकोठडीचा हा भाग आधीच शिक्षा भोगणारीच्या मनात दरारा आणत असे. काळॊखाची प्रगाढ छाया तिथे पसरली होती. जेलात असताना बाकी बायांकडून ऎकल्याप्रमाणे जेवढी शिक्षा कडक तेवढा काळकोठडीचा नंबर जास्त असे.

एकशेतेरा म्हणजे शेवटून तिसरी.
मोघेबाईंनी विजेरी पेटवली. काळॊखाला चिरत प्रकाशाचा एक तीव्र झोत पसरला अन काळकोठडीचं दार दिसलं. बिजागऱ्यांना रगडत उघडलेला एकशेतेरा नंबरच्या दाराचा आवाज दालनात घुमला अन अचानक बाकी काळकोठड्यांतले कण्हण्याचे आवाज बंद झाले. आतल्या बायकांना कुणीतरी सुटतंय किंवा शिरतंय हे कळलं अन मग अचानक दारावर आपटण्याचे, मोठ्यामोठ्याने रडण्याचे आवाज येऊ लागले. "सोडवा आम्हाला!", "बाई मला बी जाऊ द्या!", "दया करा बाई!" अशा कारूण्याने भरलेल्या आरोळ्या ऎकून ह्याच त्या दादागिरी करणाऱ्या रांगड्या खूनी बायका का? असा प्रश्न मंजुळाला चाटून गेला.

मोघेबाईंनी मंजुळाला आत ढकललं अन दार लावून घेतलं. मंजुळा दाराच्या फटीतून पाहू लागली. मोघेबाईंनी विजेरीत फाकलेला आपला मुर्दाड चेहेरा मंजुळाला दाखवला. त्यावर हास्याची रेख होती. तो उपरोध आता इथून सुटका नाही?’ अशाप्रकाराचा होता.

मंजुळा अजूनही रागाने धुमसत होती पण तिथं आल्यावर समाधानाचा एक श्वास तिनं घेतलाच...

...अजूनपर्यंत सगळं प्लाननुसार होत होतं...

...हो! प्लान!! काळकोठडीतून बाहेर पडण्याचा प्लान, डिसिल्व्हाबरोबर बनवलेला. कोठडीच्या आत तिच्या फुटक्या भिंतीशी टेकून बसलेल्या मंजुळाला गेल्या आठवड्यातला शनिवार आठवला... धोबणहौदावर कपडे धुताना डिसिल्व्हाशी केलेली बातचीत...

"आज सुजाता दिसली नाही.", डिसिल्व्हा म्हणाली.
"तिला पोटात मुरडा उठला सकाळी. सारखं ओकत होती. गेली हॉस्पिटलात.", मंजुळाने परकर आपटीत म्हटले.
"अरे जिजस! खरं की काय?"
"मग. गारण्टी नाय तिची!"
"पण जगली तर?"
"बरं हाय! निदान ह्या पिंजऱ्यातून काही दिवस तर सुटंल. नशीब चांगलं असेल तर पळून बी जाईल!"
"पळून?", डिसिल्व्हा हसली. तिच्या म्हाताऱ्या चेहेऱ्यावर सुरूकुत्या पसरल्या होत्या, "चंदरपूरच्या जेल-हॉस्पिटलात गार्ड असतात तैनात. डॉक्टरला पण कार्ड बघितल्या शिवाय जाऊ देत नाहीत. येणारी जाणारी प्रत्येक डेड बॉडी पूर्ण चेक करत असतात. पळून जाईलच कशी ती?"

डिसिल्व्हाची भाषा बरीच सुधारलेली होती. जेलमध्ये बसूनच तिनं एम.ए. केलेलं. कदाचित जेलमधली ती एकमेव ग्रॅजुएट असावी. नाहीतरी तिचं अवघं आयुष्य जेलमधून सुटणं शक्य नव्हतं. जन्मठेपेची चार जणांची हत्येची शिक्षा होती तिला. हुंडा देत नाही म्हणून शारिरीक छळ करणारे नवरा, सासू, सासरा अन नणंद अशा चार जणांना ख्रिसमसच्या केकमध्ये विष मिसळून मारलेलं तिनं
मग स्वतःही तोच केक खाल्ला. पण नशीब फुटलं अन ती वाचली. तेव्हापासूनच इथं होती. एवढा खुनी भूतकाळ असूनही ह्या जेलातल्या चार चौघींसारखी मात्र ती खुनशी नव्हती.

"काय बोलते?", मंजुळाने खांदे उडवले.
"मग तर! जेलात मरून मग मसणात जाऊन तिथून पळून गेली तर जगेल. पण जेल-हॉस्पिटलातून पळून जायचा काय चान्स नाही."
डिसिल्व्हाच्या ह्या जोकवर मंजुळा हसली. डिसिल्व्हा तिची आधीपासूनची जेलातली मैत्रिण. सुरूवातीचे पाच वर्षं दोघी एकत्रच एका कोठडीत होत्या. मग म्हाताऱ्या डिसिल्व्हाला जेलातली कामं मिळण्यास सुरूवात झाली. ती जेलाचे पोस्ट सांभाळायची. जेलातल्या पोलिसांचे कपडे धुवायची. सध्या जेलात फासावर किंवा निसर्गतः मेलेल्यांची डेड बॉडी सांभाळायची तिला ट्रेनिंग देण्यात आली होती. त्यामुळं जल्लादाची नवी पोस्ट तिचीच होती. कित्येक वेळा आरोपी मेल्याचं सर्टीफिकेट डॉक्टरकडून मिळाल्यापासून डेड बॉडीची धर्मानुसार विल्हेवाट लावायचं काम पण तिच करत होती. साठ वर्षांची ही बया ही सगळी कामं करण्यात बरीच तंदुरूस्त होती त्यामानानं. सांधे, मणके, डोळे सगळं व्यवस्थित. अधून मधून मोघेबाईंच्या डोक्याला मसाजही करायची ती. ह्यामुळंच मोघेबाई तिच्याशी अदबीनं वागायच्या.
"काय ग मारिया? मसणातून पळून जायचं शक्य हाये? म्हंजी हिंदू सम्शान तर हास्पिटलाच्या बाजूस हाये ना? तिथंही गार्ड असतीलच की."
"ते आहे. पण मागल्या ख्रिश्चन स्मशानभूमीत कुणी येत जात नाही. तिथं बॉडी पेटीत बंद करून बुजवून टाकली की मग तिचा कुणी वाली नाही. पेटीतून बाहेर येवून मग मागल्या फुटानं बाभळीच्या बनातून सीधा राज्याबाहेर. आंध्रात."
"शक्य आहे?"
"३५ वर्षं बघतेय मी. तिथे कुणी फिरकत नाही. नाहीतरी जेलात इन मीन पाच बायका ख्रिश्चन. त्यात कुणीही मरायला आलेलं नाही. मग ख्रिस्ती मसणात गर्दी होईलच कशाला? कोण लक्ष ठवंल तिथं. फक्त तिथं जायला जेलरबाईंची परवानगी लागते. तिच्याकडेच चाबी आहे."
"मग तू कंधी ट्राय नायी केलं?"
ह्यावर डिसिल्व्हा उपहासाने म्हणाली, "मला पळायचे नाही. माझा दीर अजून जिवंत आहे. बाहेर पडेन तसा तो मला गोळी घालेल."
"आगं पन नाहीतरी मरायची काय भीती तुला? आतमहत्या केलेली ना?"
"वेडी होते मी तेव्हा. जेलात राहून शिकले. इथे आपल्यापेक्षा वाईट आयुष्य जगलेल्या स्त्रिया बघते.", असं म्हणून डिसिल्व्हाने मायेनं मंजुळाकडे बघितलं, "तुमच्या मानाने वाटतं हे ईश्वराने दुसरं आयुष्य दिलंय मला. पिंजऱ्यात तर पिंजऱ्यात. लॉर्ड जिजसने फाशी होऊ दिली नाही. तिही एक कृपाच झाली माझ्यावर. फादर क्रास्टॊंनी मला जीवनाचा नवा मार्ग शोधून दिला. शिकले. एम.ए. झाले. आता मृत्यू नैसर्गिक यावा असे वाटते. जिजसच्या पायी पापं घेऊन नाही जायचंय मला."
"अगं पण शिक्षा भोगलीस ना हितं? मग कसलं पाप?"
"पण बाहेर जाऊन पुन्हा माझ्या दीराच्या हाती होणाऱ्या खुनाचं कारणही मीच ठरेन ना? तेही एक पापंच की."
"बरी देवावर श्रद्धा ठेवते एवढी तू. मी तर देवाची पायरी चढले नाही समद्या २० वर्षांत. तो माझ्यासाठी मेला जेव्हा माझ्या बापानं माझी नथ उतरवली..."
डिसिल्व्हा सुन्न झाली. एवढी वर्षं एकत्र राहत असतानाही तिनं एकदाच मंजुळाच्या तोंडून तिची कहाणी ऎकली होती. आज त्याचं पुनःकथन झालं होतं. एवढे आघात सोसून जेलात सडणाऱ्या मंजुळाविषयी डिसिल्व्हाच्या मनात म्हणून एक हळवा कोपरा लाभला होता. तिची आयुष्यभर झालेली घुसमट डिसिल्व्हाला सल लावून गेली. काहीतरी ठरवून जिजसला मनातल्या मनात माफी मागत ती मंजुळाला म्हणाली,

"पळायचंय इथून?"

डिसिल्व्हाची नजर मोरीतून गटारात गायब होणाऱ्या धुतलेल्या कपड्यांच्या मळीवर लागून राहिली होती.

मंजुळा चमकली. तिनं हातातल्या साडीचा पीळ खाली टाकला. डिसिल्व्हाच्या जवळ जाऊन ती म्हणाली, "काय बोल्ली तू? पळून?"
डिसिल्व्हाने उसासा टाकला, "हो! तुला पळायचंय इथून?"
मंजुळानं आजूबाजूस इतर कुणी बघत नाही ना असं पडताळत काही सेकंद घेतली.
"हो!", डिसिल्व्हाकडे न बघता ती म्हणाली, "पण कसं?"
"धुण्याचं काम करत रहा. चेहेऱ्यावर भाव दाखवू नकोस. सांगते मी..." डिसिल्व्हा अन मंजुळा पुन्हा मोरीतल्या दगडावर कपडे आपटू लागल्या.
"इथून बाहेर निघण्यात तीन अडसर आहेत. पहिला मरायचं ढोंग करायचं. दुसरं डॉक्टरचं इन्स्पेक्शन होऊ द्यायचं नाही अन तिसरं दफन व्ह्यायचं ख्रिश्चन म्हणून."
"अगं पन दफन झाल्यावर बाहेर येनार कसं त्या पेटीतून?"
"मी येऊन खोदेन रात्री गुपचुप."
"पन पहिल्या दोन अडचनींचं काय?"
डिसिल्व्हाने दीर्घ श्वास घेतला, "मृत्युशी खेळायचंय. तयार आहेस?"
मंजुळाने डोळे मिटले, "हो!", मंजुळा निश्चयाने म्हणाली.
"तर ऎक. मी माझ्या नवऱ्याला खायला घातलेलं विष मी अजून माझ्याकडे ठेवलंय. जर अर्धा चमचा घेतलंस तर सुरूवातीच्या वांत्यांनंतर बेशुद्ध पडशील. हृदयाचा ठोका मिनिटाला दहावर जाईल. श्वासोछ्वास आणि ब्लड प्रेशर एवढा खाली येईल की साध्या माणसाला तू मेली असंच वाटेल. फक्त तोंडात जिभेखाली तुरटीचा मोठा तुकडा ठेवून विष पी. हळूहळू विरघळत मग ती तुरटी चार पाच तासात पोटात जाऊन तिथलं विष आटवून संपवेल. सकाळी मेल्यावर तू संध्याकाळी पुन्हा शुद्धीवर येशील. मग मी रात्रीच्या प्रहरात येऊन कबर खोदून पेटी काढून तुला सोडवेन. पुढच्या रविवारी रात्री नऊ वाजता गार्ड शिफ्ट बदलेल. तेव्हा पंधरा मिनिटांसाठी कुणाचं लक्ष नसेल या जागेवर. त्यातच सगळं आटपू. मी मुद्दामून तुला उथळ जागेत दफन करीन म्हणजे उरकायला बरं पडेल. त्यानंतर मागल्या वनातून पळून जा."
"हे सगळं तुला.."
"मी अशीच वाचले माझ्या आत्महत्येनंतर."
"पन खिच्शन न्हायी मी. अन पुन्हा डाक्टरनं तपासून त्याला माझं ठोके सापडलं तर? अन रात्री ते जंगल?"
"जंगलात एक कुत्रं पण नाही. कोल्ही असतील तेवढीच. हवं तर एक सुरी लपवून ठेव तुझ्याकडं... पण ... ख्रिश्चन दफन होशील कशी?", डिसिल्व्हा विचारात पडली. थोडं तिनं धीर एकवटून मग विचारलं, "धर्म बदलशील? फादर क्रास्टो करतील धर्मांतर"
मंजुळा दचकली. तिच्या हातातला साबण निसटला, "काय? आता धर्म पण बदलायचा?", मंजुळा अस्वस्थ झाली.
डिसिल्व्हाच्या चेहेऱ्यावर कसलाच भाव नव्हता. पुढले दोन मिनिटं धोबणहौद गप्प होता.
"हो! मी तयार हाये.", मंजुळा नाईलाजानं म्हणाली, "उद्याच सांग फादरना. "
डिसिल्व्हा आनंदली पण मंजुळाच्या पुढच्या प्रश्नानं पुन्हा गंभीर झाली, "पन डाक्टरच्या तपासणीचं काय?"

कपडे एव्हाना धुवून संपले होते पण प्रश्न जसाच्या तसा होता.
"ठिक आहे मी ह्यावर विचार करते अन तुला सांगते उद्या.", डिसिल्व्हा म्हणाली.
मंजुळा थोडी प्रश्नांकित होतीच. त्याच संदेहात ती तिथून निघली पण थोडी पुढे जाऊन पुन्हा घुटमळली. "मारिया!", मंजुळा म्हणाली अन वळली, "माझी मदत का करतेय तू? तुज्या देवाच्या विरोधात का जातेय? पुन्हा म्या धर्म बदलंल तो इथून सुटण्यासाठी. ही पन लबाडीच ना?"
डिसिल्व्हा फक्त हसली, म्हणाली, "इथे आली म्हणून देवावरची श्रद्धा गेली तुझी. इथून जाशील तर कदाचित देवावर श्रद्धा पुन्हा ठेवशील! पुन्हा ख्रिस्ती धर्म मान नाहीतर सोडून दे, मला काही फरक पडत नाही. फक्त पुढचं आयुष्य चांगली कामं करत घालव. तुझा देव बघेल तुला अन माफही करेल."
मंजुळाला मात्र डिसिल्व्हाची किव वाटली, देव नावाच्या षंढ शक्तीची अशी दास झालेली पाहून. इथून सुटून देवावर श्रद्धा ठेवायची मंजुळाला अजिबात इच्छा नव्हती. त्या देवापेक्षा बाहेरचं मोकळं जग तिला जास्त साद घालत होतं.

डॉक्टरच्या चेक-अपचा अडसर दूर व्हायची वाट बघत मंजुळाने दोन दिवस घालवले. आज पुन्हा तिची डिसिल्व्हाशी गाठ पडली होती, धोबणहौदावर.

"काय सापडलं उत्तर?"
डिसिल्व्हा गप्पच होती.
मंजुळा हिरमुसली. इथून सुटण्याचा प्लान हातातून निसटायला लागला होता.
"मी भरपूर विचार केला गं!", डिसिल्व्हाला कण्ठ फुटला, "पण काहीच उत्तर मिळत नाही."
"डॉक्टरला लाच देऊन...", मंजुळाने आपल्या स्वानुभवानुसार प्रश्न केला.
डिसिल्व्हाने तिच्याकडे नाराजीतच पाहिले.
"म्हंजी त्याच्याशी साटलोटं करून म्हणत व्होती म्या...", मंजुळाने बोलायचा बाज बदलला.
"नाही! आपला माणून नाहीय तो. पुन्हा किती पैसे मागेल ह्यासाठी काय माहित? त्यात त्याला विचारून पुन्हा बिंग फुटलं तर? "
"ते पन ठिक.", मंजुळा चिंताक्रांत झाली. इथून निघायचा हा प्लान असाच सोडून द्यायला बराच मोहक होता, "पन तो डाक्टर सगळे मुडदे बघतो काय? म्हंजी काही मुडदे बघत नसल तर त्यांतूनच मी त्याच्या डोळ्यांआड गायब व्होयीन..."
ह्यावर डिसिल्व्हा हळूच दचकली, "ओह जिजस! कशी विसरले मी?" अचानक तिच्या चेहेऱ्यावर आनंद दिसू लागला, "तुला आठवतंय. लक्ष्मी सुतार?"
"हो ती मुलं पळवून नेणारी बया. मागल्या वर्षीच मेली ती हार्ट अटाक ने. तिचं काय?"
"अगं तिला डॉक्टरला दाखवण्यात आली नव्हती..."
"का?", मंजुळा प्रश्नांकित चेहेऱ्यानं डिसिल्व्हाकडे पाहू लागली.
"ती काळकोठडीत मेली."
"काय बोलते? मला वाटलं ती हास्पिटलात मेली म्हणून. हे महिती हाये मला की तिनं पैसे चोरले व्हते हवालदारिणीचे म्हणून टाकलं व्हतं तिला १०७ मध्ये. नंतर तिथं हार्ट अटाक आला तिला. मग हॉस्पिटलात नेवून तिथं मेली नव्हं ती?", मंजुळाला अजून कळलं नव्ह्तं.
"तिला हॉस्पिटलात नेलंच नव्हतं. त्याधीच तिने १०७ मध्ये गळफास लावला पाच दिवस भुकेली न राहावून. मेल्यावर पुन्हा तिला डॉक्टरला दाखवलं नव्ह्तं कारण काळकोठडीत कैद्याने आत्मह्त्या केली तर ती जेल प्रशासनाची चूक मानून, जेलर वर कारवाई करतात."
"काय बोलते?", मंजुळानं आ वासला होता.
"नाहीतर काय? नियमच आहे तो. कैद्यांना अमानुष वागणूक दिल्यावर त्यांच्यावर काळकोठडीत कुठला अनुचित प्रसंग ओढावू नये म्हणून करतात असं. म्हणूनच लक्ष्मीची डेड बॉडी मीच गुपचूप जाळलेली. अन इथे सगळ्यांना पोलिसांनी सांगितलं की ती हार्ट अटॅक ने हॉस्पिटलात मेली म्हणून...", डिसिल्व्हा जवळ येऊन मंजुळाच्या कानात कुजबुजली, "...जेलर बाईंनी स्वतःच कागदपत्र बनवली. सगळी खोटी..."
"!", मंजुळाचा आ वासलेलाच होता.
"कुणाला सांगू नको. इकडे फक्त मोघेबाई, चार पाच हवालदारिण अन मलाच माहित आहे ही गोष्ट.", डिसिल्व्हाने भोवती कुणी नाहीना असं बघितलं अन ती पुन्हा मंजुळाच्या कानात कुजबुजू लागली, "तू जर काळकोठडीत आत्महत्या करायचं नाटक केलंस तर हे सगळं नीट जमेल. मी ग्यारन्टी घेते."

मंजुळानं विश्वासानं मान डोलावली. तिच्या डाव्या गालात तिरपं हास्य पसरलं. एक मोठा अडसर तिच्यासमोरून अनायासे दूर झाला होता....

... हे सर्व आठवून मंजुळा गालातल्या गालात पुन्हा हसत होती. चार दिवसांपूर्वी फादर क्रास्टोनी तिला ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. तिच्या बरोबरच्या सगळ्या जेल भगिनी अन आजूबाजूचे पोलिस तिच्या गळ्यातला क्रॉस पाहून आश्चर्य चकित झाले होते. आताही ११३ नंबर मध्ये बसून मंजुळा तो गळ्यात घातलेला क्रॉस हातांशी खेळवत होती. ही कोठडी तिला स्वर्ग वाटू लागली. गळ्यत क्रॉसचं ओझं आत्ताच जाणवू लागलं होतं.

आता फक्त सकाळचा जेलचा भोंगा वाजायची वाट पहायची आहे. तेव्हा हा प्लास्टिक मध्ये लपवून आणलेला विषात बुडवलेला कापसाचा बोळा तोंडात पिळायचा, अन जीभेखाली तुरटी ठेवून छान पैकी ताणून द्यायचं, मृत्युला हुलकावणी देत. उद्याची रात्र वैराची असणार...’, तिचं तन मन शहारलं होतं. प्रियकराला प्रथमच चोरून भेटणाऱ्या तरूण पोरीसारखं चैतन्य तिच्या अंगात संचारलं होतं. आजची रात्र फक्त वाट बघायची होती...

... सकाळी इन्स्पेक्शन करणाऱ्या कॉन्स्टेबलला मंजुळाचा खोटा मृतदेह ११३ च्या काळकोठडीत सापडला... अन ठरलेल्या प्लाननुसार ती दुपार पर्यंत दफनही झाली होती...

....
....
....
....
....
आज वर्षं लोटलं मंजुळाला जेलमधून सुटून. सगळे मंजुळा नावची कुणी गेल्याची एव्हाना विसरले पण होते. एकटी सावित्री खूष होती. आज तिचा सुटण्याचा दिवस. सगळ्यांना भेटली ती आज. शेवटची भेटच म्हणा की. चंदरपूरातल्या जेलात चार वर्ष राहून पुन्हा गुन्हेगारीत घुसण्याचा तिचा अजिबात मानस नव्हता. नव्या आयुष्याची तिची स्वप्नं बरीच आल्हाददायक होती.

"अगं जाता जाता आपल्या डिसिल्व्हाबाईंना ही मिठाई देऊन जा... ", मोघेबाई म्हणत होत्या.
"व्हय बाई", सावित्री आनंदात म्हणाली.

न्हाणीघराला डावीकडे वळसा घालून एका जुन्या खपाटीला गेलेल्या खोलीत सावित्री शिरली. समोरच डिसिल्व्हा बसली होती.
"मारीयामावशी मिठाई आणलीय. आज सुटतेय म्या. पुन्हा भेट होणार न्हाई." तिनं डिसिल्व्हाला मिठाई दिली पण डिसिल्व्हाच्या हातून ती पडली, सावित्रीने सुन्न मनाने ती पुन्हा उचलली, "समदं ठिक हुईल. ह्यो गुर्जरबाबाचा अंगारा घे. आज बराबर एक वरीस लोटलं त्या दिवशीला. मला बी आठवोय तो भयानक दीस. माझी नरडी मंजुळाने घोटली तोच. डाक्टर काही म्हनतील पन तू धीर नगं सोडूस... काळ कसा येतो बघ... जाते मी..." सावित्रीने डोळ्यांना पदर लावला. अन ती मागल्या वाटेनं निघून गेली.

खुर्चीत निपचित पडलेली मारीया मनातल्या मनात रडत होती... मंजुळा काळकोठडीत गेली अन त्याच दिवशी तिला लकवा मारला. बोलणं, हलणं सारं बंद झालं. डॊळे शून्यात गेले. अशा अवस्थेत मंजुळाला पाच फीट जमिनीत दफन करायचं काम स्वतः जेलर बाईंनी केलं होतं...

...प्रत्येक क्षणागणिक कॉफिनमध्ये वाट बघणाऱ्या मंजुळाचा भाबडा चेहेरा मारियाच्या मनात काहूर माजवून जात होता...



....... आज कित्येक वर्षांनी त्याच मंजुळाच्या कबरीवर एक बाभळीचं रोपटं फोफावलंय.